बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून दिवाळीपूर्वीच विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन
शहर
सर्व प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये उत्सवापूर्वी स्वच्छता करणार
मुंबई: अवघ्या चार दिवसांवर आलेल्या दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर पालिका प्रशासनाच्या वतीने मुंबईतील सर्व प्रमुख व अंतर्गत रस्ते, दुभाजक, पदपथ यांसह बाजारपेठ परिसरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. १५ ते १९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली.
‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ हा ध्यास घेऊन मुंबई शहर तसेच उपनगरात उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरात व्यापक स्वच्छतेच्या अनुषंगाने वेळोवेळी विशेष स्वच्छता मोहीम राबविली जात आहेत. १५ ते १९ ऑक्टोबरदरम्यान दिवाळीपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या ‘पिंक आर्मी’ च्या सहाय्याने ही मोहीम सायंकाळी व रात्रीच्या वेळेत राबविण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रमुख व अंतर्गत रस्ते, दुभाजक, पदपथ, चौक व बाजारपेठ परिसरांची संपूर्ण स्वच्छता केली जाईल. या अंतर्गत रस्ते तसेच गल्लीबोळातील कचरा, माती, राडारोडा आदी संकलित करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल.
” या मोहिमेसंदर्भात डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, “येत्या शनिवारपासून दिवाळी सणाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे सण साजरा करण्याच्या उत्साहासोबतच मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ आणि नीटनेटकी राहावीत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘पिंक आर्मी’चा सहभाग, वाढीव मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही विशेष मोहीम राबविण्यात येईल.
नाल्यातून १२४.५५ टन कचऱ्याचे संकलन
नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी महानगरपालिकेकडून २९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एकूण ४,९७४ मनुष्यबळ, स्वच्छतेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या ४७९ साधनसामग्री तसेच वाहनांच्या साहाय्याने सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड) विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत एकूण १२४.५५ टन कचऱ्याचे संकलन करुन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी दिली.